रुग्णालय व्यवस्थापन

वेगाने विस्तारणाऱ्या रुग्णालय व्यवस्थापन क्षेत्रासंबंधीची ओळख..
आरोग्य व्यवस्थेचे व्यवस्थापन ही ज्ञानशाखा गेल्या काही वर्षांत विकसित झाली आहे. देशातील ‘अ’ श्रेणीच्या शहरांमध्ये कॉर्पोरेट्सच्या संकल्पनांनुसार आणि तत्त्वांनुसार आरोग्यसेवा उभ्या राहत आहेत. गेल्या काही वर्षांत आरोग्यसेवेचे रूपांतर मोठय़ा उद्योगामध्ये झाले आहे. मोठी रुग्णालये, अत्याधुनिक यंत्रसामग्री, दर्जेदार वैद्यकीय उपचार अशी काही गुणवैशिष्टय़े या सेवेशी निगडित आहेत. ही सेवा अथवा उद्योग वर्षांकाठी 10 ते 15 टक्के दराने वाढत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. ही वाढ आता ‘ब’ श्रेणीच्या शहरांमध्येही होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या संधीही उपलब्ध होत आहेत.

डॉक्टर तसेच इतर आवश्यक मनुष्यबळ, आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन कौशल्य, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण सेवा व आर्थिक नियोजन या सर्व बाबींचे नियंत्रण रुग्णालयाचे व्यवस्थापन करत असते. यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासते. हे मनुष्यबळ आरोग्य व्यवस्थापन शाखेशी निगडित आहे. आरोग्य सेवेच्या दर्जाच्या वृद्धीत या तज्ज्ञांचा हातभार लागतो. वैद्यकीय उपचारांसाठी लागणारे सर्व साहित्य, औषधे, यंत्रसामग्री, वाहने, वीज आदी सर्व घटकांच्या पुरवठय़ावर आरोग्य व्यवस्थापकांची सूक्ष्म नजर असते. या बाबींची उपलब्धता, यंत्रसामग्रीची दुरुस्ती आणि देखभाल याकडे ते लक्ष पुरवतात.

रुग्णालयांच्या व्यामिश्र स्वरूपाच्या प्रशासकीय बाबी त्यांना सांभाळाव्या लागतात. विविध पदांवरील मनुष्यबळाची नियुक्ती -निवड, कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन, वेतनवाढ, मनुष्यबळ विकास या बाबींकडे लक्ष पुरवावे लागते. या व्यवस्थापकांचा अंतर्गत समन्वय राखण्याचेही काम करावे लागते. रुग्णालयातील कामगार संघटना, समाजसेवक, स्वंयसेवक यांच्याशी उत्तम संबंध राखून कामकाज व्यवस्थित आणि सुरळीत चालू राहील याची दक्षता घ्यावी लागते. रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या सेवांचा दर्जा घसरणार नाही आणि रुग्णांच्या तक्रारी येणार नाहीत याचीही काळजी घ्यावी लागते. रुग्णालयाच्या विस्ताराचे आणि विकासाचे नियोजन करावे लागते. त्याचा आराखडा तयार करून त्याची कालबद्ध अंमलबजावणीसुद्धा करावी लागते.

Leave a Reply